पोलिसांनी रोड रोमिओंची काढली धिंड, व्हिडिओ व्हायरल

सातारा : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी पोलिसांनी रोड रोमिओंना मोठा दणका दिला आहे. बसस्थानक, शाळा, कॉलेजच्या परिसरात मोटरसायकलवरून फिरणाऱ्या रोड रोमिओंना ताब्यात घेवून त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. पोलीस ठाण्यात नेवून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरूणांना पोलीस ठाण्याकडे नेतानाचा व्हिडिओ दहिवडी परिसरात चांगलाच व्हायरल झाला आहे.

पोलिसांची कारवाई

दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गुरुवारी रोडरोमिओंवर धडक कारवाई केली. बसस्थानक, कॉलेज, महात्मा गांधी विद्यालय, परशुराम शिंदे कन्या विद्यालय, अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथके तैनात करून धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक समीर शेख, वडूजच्या डीवाएसपी अश्विनी शेडगे यांच्या सूचनेनुसार महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत आणि ‘पोलीस दीदी, पोलीस काका’, या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

21 हजारांचा दंड

रोड रोमिओ, महाविद्यालयीन युवक, युवती, बेशिस्त वाहन चालक, विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांसह अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांच्या ताब्यात गाडी देवू नये, असे आवाहन दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केलं आहे. दरम्यान, बेशिस्त वाहन चालवणाऱ्या रोडरोमिओंवर पोलिसांनी मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करत 21 हजार रूपयांचा दंड वसूल केला.

Leave a Comment