राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशाच परिस्थितीत किल्ले रायगडावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रायगडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात काही पर्यटक रायगड किल्ल्यावर भटकंतीसाठी गेले होते. या पर्यटकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. रायगड किल्ल्यावरून एखाद्या धबधब्याप्रमाणे प्रचंड वेगाने पाण्याचे लोट खाली येऊ लागले. अशा परिस्थितीत काही पर्यटक या पाण्यामुळे पायऱ्यांवर अडकले होते. या घटनेचा हा धडकी भरवणारा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओ-
किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश पाऊस सुरू असून धडकी भरवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धो-धो पडणारा पाऊस आणि ढगफुटी सदृश परिस्थिती यांमुळे किल्ले रायगडाच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये किल्ल्याच्या पायऱ्यांवरून अक्राळविक्राळपणे पाणी वाहताना दिसतंय. त्यात काही पर्यटकसुद्धा अडकल्याचं दिसून येत आहे. बुरूज आणि कड्यांवरूनही धबधब्यासारखं पाणी वाहतंय. पर्यटक आणि शिवप्रेमी हे तारेवरची कसरत करत त्या वाहत्या पाण्यातून खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहेत.
रायगड किल्ल्यावर जाण्यास प्रवेश बंदी
या घटनेच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर जाणाऱ्या वाटा बंद केल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. गडावर चालत जाणाऱ्या मार्गावर बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तिथे पोलिसांचा 24 तास बंदोबस्त राहणार आहे. गडावरील रोपवेची सेवाही बंद करण्यात आली आहे. आजपासून (8 जुलै) रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. किल्ल्यावर पायी जाणाऱ्या चित्त दरवाजा आणि नाणे दरवाज्याच्या मार्गावर बॅरीकेटिंग करण्यात आली आहे. तसेच, पावसामुळे गडावर अडकलेल्या नागरिकांना रोपवेच्या साहाय्याने खाली उतरवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
रागयड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात सरासरी 77 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर माथेरान येथे सर्वाधिक 220 मिलीमीटर पाऊस पडला आहे. हवामान विभागाने आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने आठवडाभराच्या विश्रांतीनंतर चांगलंच झोडपून काढलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड आणि तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. या हंगामातील पहिल्यात अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना महापूर आला आहे. जिल्हा मुख्यालय ओरोस, बांदा शहरात पाणी शिरलंय. तर सावंतवाडी शहरातील बाजारपेठ जयप्रकाश चौक रस्त्यावर पाणी आल्याने दुकानदारांची पळापळ सुरू झाली.