तीन बड्या नेत्यांच्या गुप्त बैठकीमुळे माजली खळबळ
मराठवाड्यातील तीन बड्या नेत्यांची बंद दाराआड बैठक झाली आहे. त्यामुळे या गुप्त बैठकीत नेमकं काय शिजलं आहे? याचा कयास राजकीय वर्तुळात लावला जात आहे. तसेच या गुप्त बैठकीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नेत्यांना याची कबुली द्यावी लागली आहे. या बैठकीत हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि हिंगोलीचे ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील यांच्यात ही बैठक पार पडली आहे. ही बैठक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडली आहे.
या बैठकीबाबत माहिती देतांना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, तुम्ही माध्यमांनी माझं ऐका. मी हिंगोली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने ते दोन्ही नेते मला भेटायला आले होते. नागेश पाटील हे हिंगोली जिल्ह्याचे खासदार आहेत. ते माझ्या बंगल्यावर मला भेटायसाठी आले होते. मंत्रालयात मला भेटायला आले. अशा पद्धतीत कुठेही राजकारण नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे ते माझ्याकडे फक्त जिल्ह्याच्या कामासाठी आले होते. आमदार संतोष बांगर हे सुद्धा या बैठकीला होते. मी दोघांसोबत चर्चा केली. या चर्चेत कोणतंही राजकारण नाही, असा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केला.
अब्दुल सत्तार काय म्हणाले?
मी बैठकीत आहे. मी नाही असं बोललोच नाही. मी बसलो. त्यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्याच्या बाबतीत चर्चा झाली. राजकारणाच्या बाबतीत अशी ओपन चर्चा करता येत नाही, असं सत्तार यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचा एक खासदार वाढवत आहात, अशी चर्चा आहे. याबाबत काय सांगाल? असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी याचं उत्तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे, असं म्हटलं. एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. आपण त्यांना विचारुन घ्या. जे जे त्यांच्यासोबत आहेत, ते त्यांना सोबत घेतात. आमच्या सारखा कार्यकर्ता त्यांच्यासोबत जोडण्याचं काम करतो, अशी सूचक प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
अब्दुल सत्तार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आमदार, खासदार, माजी आमदार, खासदार यांच्या विकासाच्या मुद्द्यांवर कुठल्याही ठिकाणी कमी पडत नाही. मुख्यमंत्री विकास कामांसाठी योग्य निधी देत आहेत. एकनाथ शिंदे हे आमचे अंतिम सत्य आहेत. मी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच शिवसेनेत आलो असल्याचे सत्तार यावेळी म्हणाले.
नागेश पाटील आष्टीकर काय म्हणाले?
ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरण यांनीदेखील या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले की, मी लोकप्रतिनिधी आहे. मला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटावं लागणारच आहे. मला न्याय मंदिरात यावच लागेल. कुणीतरी या छोट्या गोष्टीची चर्चा सुरु केली आहे. कुणीतरी खोडासळपणे लपूनछपून फोटो काढलेला आहे. कुठल्यातरी एका कॉर्नरमधून फोटो काढण्यात आलेला आहे. मोदी आमच्या विरोधात आहेत, तर मी त्या सभागृहात जायचंच नाही का?, असा सवालही यावेळी नागेश पाटील यांनी केला आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकीत शिंदेसेना विरुध्द ठाकरे सेना यांच्यात लढत झाली. या बैठकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले होते. या निवडणुकीत ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विजय मिळविला. मात्र जिल्हयाचे पालकमंत्री अब्दूल सत्तार हे शिंदेसेनेचे असल्यामुळे खासदार आष्टीकर यांना विकास कामांमध्ये न्याय मिळेल का याची चर्चा सुरु होती.